भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधींच कृपाळू भोळा महादेव । जाणितला भाव कुरंगांचा

adhinch krupalu bhola mahadev | janitala bhav kurangancha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आधींच कृपाळू भोळा महादेव । जाणितला भाव कुरंगांचा ॥१॥ कृपा केली देवें मांडिला सन्मान । धाडिलें विमान दूताहातीं ॥२॥ लखलखित टके पताका डोलती । तयामाजी होती गीत नृत्य ॥३॥ नाना सुमनांची शय्या आरुवर । करिती उपचार सिद्धि आड ॥४॥ आले अकस्मात तयाचियेपाशीं । पाहतां सर्वांसी नवल वाटे ॥५॥ दिव्य दएह झाले पांचांचे ते काळीं । विमानीं बैसली लागवेगें ॥६॥ पारधी देखोनी तटस्थ राहिला । दूतीं तया केला उपदेश ॥७॥ शिवरात्री आजी जागरण उपवास । केला तेणें दोष सर्व गेला ॥८॥ करोनी पारणें होईं शिवभक्त । आशापाशीं चित्त गोवूं नको ॥९॥ अखंड कीर्तन शिवनामाचें करीं । तेणें मोक्षपुरी पावसील ॥१०॥ पुढिल्या शिवरात्री नेऊं कैलासासी । सांगोनियां त्यासी गेले वेगीं ॥११॥ नामा ह्मणे मोक्ष झाला त्या पांचासी । वस्ति चंद्रापाशीं केली त्यांनीं ॥१२॥